ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, January 12, 2012

१०८. उदघाटन


नमस्कार एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
कोण आहेत हे? मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले. त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळ मी नेहमीच करते. आणि त्यामुळे अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसच झालेलं दिसतंय. म्हणून त्या खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.

तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते. त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का? अस विचारण्यात झाली. मी कोण आहे (आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पडून खासदार महोदय सैलावले.

राजस्थानमधल्या एका गावात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याच उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे पाहिलं होत. विशेषत: जिथ मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो – तेव्हा गावक-यांच्या मनात जे येत ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल माझ मत चांगल आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हत. म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.


आम्ही मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळलो तेंव्हा
मोहरीची फुललेली शेत समोर आली. सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता. रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेन गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हत. आधी मला वाटलं गावात कोणाच तरी लग्न असणार – पण तस काही नव्हत. हा मंडप रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलच.


आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाउस झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हत. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमच स्वागत केलं. हे या गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करण ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच कौतुक वाटलं.

रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना घरापर्यंत आणणारा असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती.  तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा अर्थातच!

चहापान झालं आणि ट्रे घेऊन आणखी एक माणूस आला. आमच्या ग्रुपमधल्या कोणीच त्यातल काही घेतलं नाही तेव्हा माझ तिकडे लक्ष गेलं. जमलेल्या गर्दीत जाऊन तो माणूस परत आला तेव्हा मी त्याचा हा फोटो काढला.

 धूम्रपानाच्या धोक्यांबाबत इतक सगळ सांगितलं जात; ते किती व्यर्थ आहे याचा साक्षात्कार होता तो माझ्यासाठी.


मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला. मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन शब्दांच्या बरच जवळ पोचेल इतकच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट मला आठवत तस आधी बरच जास्त होत – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६० नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून १०७०३ गावे जोडली गेली.

ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे. रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही. 

कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या.




आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.


परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त फलक तिथ होता.

इथ रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात आली.
होईल इथ बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथ राहतात आणि त्यामुळे या अधिका-याच इथ नियमित येण असत.

उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का पण? 
*

16 comments:

  1. असाच कोणाचा भाऊ असला तर त्यातले काही होत असतील. किंवा जसा मुंबई-नाशिक झाला तसे काही घडल्यावर.... :)

    बाहेर उभ्या स्त्रियांचा फोटो पाहून खूप उदास वाटलं. रस्ते कदाचित जास्त बनतीलही पण स्त्रियांविषयीची धारणा अजूनही पायवाटेवरच रेंगाळतेय... :(:(

    आजकाल बहुतांशी पत्रकार घटना पोचवण्याचे काम करतात. तू घटना आणि विचार दोन्हीही... :)

    ReplyDelete
  2. रस्त्याच्या कामाचं उदघाटन, मग रस्ता झाल्यावर (झाला तर) पुन्हा समारंभ किती हुशारीने कारणं शोधली जातात, जनतेवर 'विकास झाला आणि तो आम्हीच केला' हे बिंबवण्याची.

    रस्ते, पाणी, वीज यातून निश्चित सर्वांचे, विशेषत: स्त्रियांचे कष्ट कमी होतातच. पण स्त्रियांचा सन्मान? समाजमनाची मशागत झाल्याखेरीज कसा मिळेल? नाहीतर असतातच त्या मांडवाबाहेर किंवा फारतर प्रमुख पाहुण्यांना ओवाळायला.

    ReplyDelete
  3. सविता ताई,तू लिहिलेले मनापासून पटले..आणि समर्पक त्याच घडीला काढलेल्या छायाचित्रांमुळे तर हा लेख अजूनच वाचनीय झाला आहे...:)
    सामान्य जनता,खेडोपाडी गेल्याशिवाय दिसू हि शकत नाही आणि त्यांचे प्रश्न कळूही शकत नाहीत.रस्ते,ह्या सर्व लोकांसाठी किती महत्वाचे असतील...आणि शेतकऱ्यांसाठी देखील त्यांना खास महत्व आहे हे नक्कीच.
    रस्त्याचे बांधकाम हाती घेतले जरी गेले तरी ते पूर्ण होतात का हा एक प्रश्नच आहे.ह्या गावातील लोकांचे लहानसे विश्व,त्यांचे प्रश्न मात्र खूप मोठे असतील...सरकार ने ह्या सर्वाचा नुसता विचार करून आराखडा मांडून ठेवून आणि समारंभातून उपस्थिती दाखवून काहीच होत नसावे,,,खरे तर ह्या गावातील लोकांपर्यंत बरच काही पोहोचणे गरजेचे आहे,स्त्रियांना देखील त्यांच्या अस्तित्वाचे महत्व वाटले पाहिजे...कोणास ठावूक ह्या भगिनी ज्या छायाचित्रात एका वेगळ्या गटात उभ्या आहेत त्यांच्या मनात काय विचार असावेत त्यांच्या आयुष्याबद्दल....
    आणि एक तू काढलेले छायाचित्र....हातात tray घेतलेली एक व्यक्ती,धुम्रपान करू नये हे सर्वत्र जरी दिसले तरी प्रत्यक्षात मात्र सिगारेट आणि विड्यांच्या उत्पादनात मिळणारा फायदा कोण सोडेल??त्यामुळे सगळेच जगात दुहेरी चालते,हे वाईट करू नका एका बाजूने म्हणायचे आणि मग त्या गोष्टीचे कौतुक पण जाहिरातीतून दाखवून,उत्पादन पण चालू ठेवायचे....शेवटी निष्कर्ष....प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे चांगले वाईट ठरवायचे...आणि काय!!!

    ReplyDelete
  4. अनुभव शब्दबद्ध करण्याची आपली हातोटी विलक्षण आहे,त्या मुळे आपला हा लेख अधिक वाचनीय झाला आहे. छान..आवडला ...

    ReplyDelete
  5. भाग्यश्री, मी या सा-या दृश्याकड जरा वेगळ्या नजरेन पाहते ... एक काळ असा होता आणि आजही काही ठिकाण अशी आहेत की तिथ स्त्रिया इतकही सामील होऊ शकत नाहीत. त्यामानाने इथ स्त्रिया निदान आल्या होत्या हेच माझ्या दृष्टीन मोठ पाउल आहे. अजून पुढे जायला पुष्कळ वाव आहे ... पण जे झालय तेसुद्धा महत्त्वाच आहेच. उद्या या स्त्रिया कदाचित आत मंडपात येऊन बसतीलही ... आपले प्रयत्न त्या दिशेने होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  6. प्रीति, असे समारंभ आपल्याला दिसतात तितके लादलेले नसतात .. लोकांना त्यात सामील होण्याचा उत्साह असतो. शिवाय या कार्यक्रमात मी सविस्तर लिहील नसलं तरी, रस्ता किती लांबीचा, त्यासाठी काय वापरणार, तो कधी पूर्ण होणार हे सांगितलं गेल. गावक-यांनी मालाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावं आणि काही तक्रार असल्यास ती कोणाकडे करायची तेही सांगितलं गेल. मला वाटत नाईलाजाने का होईन सरकारला 'पारदर्शिता' हे तत्त्व पाळाव लागतय .. त्याचा उपयोग समाजातल्या दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी करून घ्यायला पुरेसा वाव आहे. तिथ आपल्यासारख्या लोकांना खूप आव्हान आहेत आणि करण्यासारखही पुष्कळ आहे.

    ReplyDelete
  7. श्रिया, वरती भाग्यश्री आणि प्रीति यांना लिहिलेल्या प्रतिसादात तुझ्या काही मुद्द्यांची उत्तर मिळाली असतील अशी आशा आहे. बाकी राहिला धूम्रपानाचा विषय. लोक जेव्हा नकाराचा पर्याय वापरत नाहीत आणि फुकट मिळतं म्हणून व्यसनांच्या आधीन जातात तेव्हा काय करायचं ते मलाही कळत नाही. बिडी-सिगारेट ही तिथली 'मानाची' पद्धत आहे. कदाचित त्याला दुसरा काहीतरी तितकाच आकर्षक पर्याय शोधायला लागेल. अशा वस्तू फुकट पुरवून लोकांना बांधील करून ठेवायचे ही श्रीमंतांची जुनी युक्ती आहे. पण आता शिकून सवरून लोक त्याला बळी पडतात. आपण मोठ्या लोकांच्या 'किती जवळचे' आहोत हे दाखवायची हौस सगळ्यांनाच असते. त्यामुळे अपेक्षित बदल व्हायला अजून बराच वेळ लागेल अस दिसतंय.

    ReplyDelete
  8. mynac, 'अधिक वाचनीय'? म्हणजे तुम्ही इतरही काही लेख वाचलेले दिसताहेत इथले.
    आभार.

    ReplyDelete
  9. लेख नेहमीप्रमाणेच सुंदर झालाय. तुमचे निरीक्षण वाखाणण्यासारखे आहे.
    रस्ता नक्कीच पूर्ण होईल. :) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही भारतातल्या सर्वात यशस्वी योजनांपैकी एक आहे. भ्रष्टाचार होतोच, पण खरंच चांगले रस्ते बनतात आणि दुर्गम भागातली खेडीपाडीसुद्धा मुख्य रस्त्याला जोडली गेली आहेत. या योजनेचा फ़ायदा मी प्रत्यक्ष बघितलाय, अनुभवलाय.
    दुसरा मुद्दा स्त्रियांचा, राजस्थानमध्ये अजूनही स्त्रियांवर बरीच बंधने आहेत, दुय्यम दर्जा आहे. माझा एक राजस्थानी मित्र याचे ’ संस्कृती, आदर-सम्मान’ या नावाखाली समर्थन करत होता. :( मग मी २ तास त्याच्याशी वाद घालून त्याचे दात घशात घातले.
    बिडी-सिगारेटच्या ट्रेचा तो फ़ोटो बघून मला आमच्या गावाकडच्या प्रथा आठवल्या. आमच्या भागात पण हीच पद्धत आहे. लग्न जुळले की दोन्हीकडच्या पाहुण्यांना मानाचा विडा आणि विडी-सिगारेट देण्याची प्रथा आहे. :D गावातल्या कार्यक्रमात मानवाईक व्यक्तींना पण दिली जाते. पण फ़ुकट मिळते म्हणून घेतातच असे नाही. जे पिणारे असतात ते घेतात, बाकीचे नाही घेत, फक्त विडा घेतील. अनिष्ट प्रथा आहे खरी. पण इतक्यात जाईल असे वाटत नाही, उलट आता बिडीची जागा सिगारेट घेत आहे.
    सांसदाचा किस्सा गमतीदार होता :))

    ReplyDelete
    Replies
    1. संकेत, 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजेने'बाबत आपल एकमत आहे हे वाचून बर वाटलं.
      तुमच्या राजस्थानी मित्राच थोड का होईना मतपरिवर्तन झाल असेल .. निदान आपल मत चुकीच असू शकत याची त्याला थोडीफार जाणीव झाली असेल .. त्यांमुळे निदान त्याच्या आयुष्यातल्या विविध स्त्रियांच (आजी, आई, बहीण, वाहिनी, पत्नी, मुलगी, मैत्रीण - असलीच तर - ) आयुष्य निदान अधिक सुखावह होईल आजच्यापेक्षा.
      बिडी -सिगारेट फुकट मिळते म्हणून कोणी घेत नाहीत हे बरोबर आहे .. पण सुरुवातीला सवय लागण्यात या फुकटेपणाचा मोठा वाटा असतो.

      Delete
    2. सविता, लेख छान आहे. फक्त बर्‍याच जागी अनुस्वार द्यायचे राहिले आहेत त्यामुळे वाचताना रसभंग होतो. जसं इथ, असत इत्यादी.

      Delete
    3. मोहना, इतक्या बारकाईने लेख वाचल्याबद्दल आणि मला चुका कळवल्याबद्दल आभार. काही ठिकाणी 'लं'ऐवजी 'ल' पडलं होत ते दुरुस्त केलं. पण 'इथ' आणि 'असत' अशा शब्दांच्या शेवटी पण अनुस्वार असतो याची मला खात्री नाही. तुम्ही ते सांगताय म्हणजे असणार तरी परत एकदा खात्री करून घेते :-(

      Delete
  10. आतिवास, ज्यांना जग पाहायला मिळत नाही त्यांनी तुझ्यासारख्यांचा ब्लॉग वाचावा असं मी म्हणेन.आम्हाला या गावी घेऊन गेल्याबद्दल तुझे आभार.

    बाकी मोहना म्हणतेय ते बरोबर आहे. अनुस्वारांची कमतरता मला ही भासली :)

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीराज, आता या निमित्ताने मी पुन्हा एकदा व्याकरणाच्या अभ्यासाकडे वळतेय. शाळेत असताना पूर्ण दुर्लक्ष केलेला विषय होता तो मी :-)

      Delete
  11. सविता, बोली भाषा, जी आजकाल आपण लेखनातही वापरतो ती वापरताना इथे, तिथे, वाटले असे न लिहता इथं, तिथं, वाटलं, असं लिहतात. मनोगत डॉट कॉमवर http://www.manogat.com/ शुद्धलेखनचिकित्सा आहे त्याचा वापर मी नेहमी करते. अनुस्वाराची खात्री नसेल तिथे त्याला पर्यायी शब्दाचा वापर हा एक उपाय. बघ कदाचित तुला उपयोगी पडेल माझा अनुभव म्हणून लिहलं :-)

    ReplyDelete
    Replies
    1. मोहना, तुमच्या आणि श्रीराज यांच्या प्रतिसादानंतर आज व्याकरण शोधाच्या मागे लागले - आता पुस्तक नाही इकडे जवळ (आत्ता मी 'इथ' शब्द लिहायचा टाळला आणि 'इकडे' लिहिला...) म्हणून जालावरच शोधाशोध केली. त्यात 'मनोगत' सापडलं ... पण त्यात मला नेमका संदर्भ अजून मिळाला नाही. शोधते आता. हा एक चांगलाच विषय डोक्यात शिरला आहे तर त्याच्या खोलात जाते आता ...

      Delete